पैठण येथे अधिकारी नाही, तर वारकरी म्हणून भाविकांची सेवा करण्याचे केले आवाहन

Foto
पैठण, (प्रतिनिधी) नाथषष्ठी सोहळा हा अध्यात्मिक सोहळा असल्याने अधिकारी यांनी अधिकारी नाहीतर वारकरी म्हणून नाथषष्ठी सोहळ्यात आलेल्या वारकरी भाविकांची सेवा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पैठण येथे नाथषष्ठी यात्रेच्या निमित्त आयोजित केलेल्या प्रशासकीय बैठकीत बोलताना केले.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, डीवायएसपी. सुनील पाटील, तहसीलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, महावितरण चे सुजित वंगळ, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र कांबळे, एसटी महामंडळाचे औटे, भूषण कावसनकर यांच्यासह विविध भागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नाथषष्ठी यात्रेला तुकाराम बीजेपासून सुरुवात होणार आहे. प्रत्यक्षात ९, १०,११ मार्चपर्यंत ही यात्रा होणार आहे. ती गुढी पाडव्यापर्यंत सुरू असते. राज्यात दुसऱ्या क्रमांकाची यात्रा म्हणून नाथषष्ठी यात्रा ओळखली जाते. या यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपरातून ६०० ते ७०० दिंड्याद्वारे जवळपास दहा लाख वारकरी भाविक सोहळ्यात सहभागी होतात. 

यावर्षी या सोहळ्याचे हे २२७ वर्ष आहे. यात्रा काळात येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा सुविधा, निवासाची व्यवस्था, आखंडित वीजपुरवठा, सुरक्षा यंत्रणा फिरते स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध केल्या जातात. या सुविधा देण्याच्या अनुषंगाने सर्व यात्रा काळात डिजिटल बॅनरला बंदी, यात्रा काळात सर्व प्रकारच्या डिजिटल बोर्ड, स्वागत कमानी यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून विनापरवानगी डिजिटल बोर्ड स्वागत कमानी लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी दिली.

विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी स्वामी यांनी बोलावली होती. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना यात्रा काळात सर्वांनी यात्रेकरूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या.